श्रीकृष्ण मंदिर व आश्रमाने महानुभावीय - विचारांचा वसा जपला : आ. पाटील वनवासमाची येथे श्रीकृष्ण मंदिराचा कलशारोहण उत्साहात

- वनवासमाची येथे श्रीकृष्ण मंदिराचा ओगलेवाडी : पन्नास वर्षापूर्वी कमळाबाई लासूरकर यांनी वनवासाची येथे श्रीकृष्ण मंदिर व आश्रमाची स्थापना केली. तेव्हापासून या मंदिराने व आश्रमाने महानुभावीय विचारांचा वसा आणि वारसा जपला आहे, असे प्रतिपादन कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांनी केले. वनवासमाची (सदाशिवगड), ता. कराड येथे सुमारे एक कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिराचा कलशारोहण समारंभ, मूर्ती प्रतिष्ठापणा व श्री पंचावतार उपहार महोत्सव आणि कृष्णकमळ महिला आश्रमाच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आ. पाटील यांच्या उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. आनंदराव पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक दिलीप चव्हाण, अखिल भारतीय महानुभव परिषदेचे गोपीराजवावा, संत, महंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आ. पाटील म्हणाले, श्रीकृष्ण व चक्रधर स्वामी यांच्या विचाराने प्रेरित होऊन व सर्वत्याग करुन कॉम्प्युटर इंजिनिअरचे शिक्षण घेणाऱ्या संजय जाधव या अपंग तरुणाने महानुभव पंथाची दीक्षा घेतली. त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. श्रीकृष्ण मंदिर व कृष्णकमळ महिला आश्रमाच्या अध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्राने समाजास दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांचे हे आदर्शवत काम यापुढेही अखंडपणे सुरु रहावे.यावेळी आ. आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी झालेल्या धर्मसभेस महंत गोपीराज बाबा, बिडकर बाबा, शेवलीकर बाबा, सुभद्रा कपारे, पूनम पंजाबी, सत्येन वावा यांची प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रमप्रसंगी कराड ते वनवासमाची दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन महानुभव आश्रम, श्रीकृष्ण सेवा मंडळ, कासार समाज कराड तसेच नवजवान व हनुमान गणेश मंडळ, शिवगर्जना ग्रुप व ग्रामस्थांनी केले. यावेळी सरपंच महादेव माने, उपसरपंच सुभाष खोचरे, बाजार समितीचे उपसभापती विजय कदम, अॅड. मानसिंगराव पाटील, नंदकुमार डुबल, प्रशांत यादव, दादासाहेब डुबल यांच्यासह परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.